विराम संपला, युद्ध सुरू; २०० ठिकाणांवरील हल्ल्यात १०९ जण ठार, पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत वाढ

गाझा पट्टी – आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून, १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत.

हमास ही दहशतवादी संघटना नष्ट करण्याच्या उद्देशानेच इस्रायलने ही लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत आणखी वाढ झाली आहे. दक्षिण गाझातील पॅलेस्टिनी रहिवाशांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी निघून जावे, असे आवाहन करणारी पत्रके इस्रायलच्या विमानांनी या भागात टाकली आहेत.

भारताकडे मदतीची याचना
दुबई : हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी उर्वरित लोकांची सुटका होण्यासाठी भारताने मदत करावी अशी विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्झोग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केली. हमासने इस्रायलमध्ये केलेला हल्ला, तसेच घडविलेले हत्याकांड यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केल्याची माहिती हेर्झोग यांच्या प्रवक्त्याने दिली.
अनेक लोक अजूनही हमासच्या ताब्यात असून त्यांचे भविष्य अधांतरी आहे. इस्रायल-पॅलेस्टाइनमधील संघर्षाच्या मुद्द्यावर राजनैतिक पातळीवरून व चर्चेच्या माध्यमातून शक्यतो लवकर तोडगा काढावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्गोझ यांना सांगितले.

– १५,०००पेक्षा अधिक गाझातील नागरिक इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत.७ ऑक्टोबरपासून इस्रायल हमास युद्धाला सुरुवात झाली आहे.
– ६,०००पेक्षा अधिक लहान मुलांचा युद्धात बळी गेला आहे.
– २५० इस्रायली व अन्य देशांच्या नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी पकडून नेले व ओलीस ठेवले.
– १०० जणांची हमासने सुटका केली.

आठ ओलिसांची गुरुवारी झाली सुटका
हमासच्या ताब्यातील ओलिसांपैकी आणखी आठ इस्रायली नागरिकांची गुरुवारी सुटका करण्यात आली. त्या बदल्यात इस्रायलने ३० पॅलेस्टिनी कैद्यांची शुक्रवारी पहाटे सुटका केली. मात्र, युद्धविरामाची मुदत संपल्याने युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
इस्रायल व हमासमध्ये चर्चेसाठी कतार देशाने मध्यस्थी केली होती. पुन्हा युद्धविराम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कतारने म्हटले आहे.

नागरिक टार्गेट नको
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी इस्रायली अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. युद्धात हल्ले करताना पॅलेस्टाइनच्या नागरिकांना लक्ष्य करू नका, अशी सूचनाही ब्लिंकन यांनी इस्रायलला केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *